📌श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा संवर्धन काम महिना अखेर पूर्ण होणार
मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची पुरातत्व विभागा सोबत पाहणी व आढावा बैठक,
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम 45 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, कामास सुरुवात केल्यानंतर अनेक प्रकारची नव्याने दुरुस्ती करण्याचे निदर्शनास आल्याने , माहे मे 2024 अखेर सदरचे काम पूर्ण करून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्वत करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी पुरातत्त्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या समवेत गाभाऱ्याची पाहणी करण्यात आली. तदनंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक घेण्यात आली. तसेच गाभारा संवर्धन कामाबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, दूरदृष्यप्रणालीद्वारे अतुलशास्त्री भगरे गुरुजी तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व बांधकाम विभाग प्रमुख बलभीम पावले उपस्थित होते.
यावेळी सह. अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेणे व मूर्ती संरक्षणास प्राधान्य देणे गरजेचे आहे. गाभाऱ्यातील फरशी काढल्यानंतर काही नव्याने कामाच्या बाबी निदर्शनास आल्यामुळे व काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने काम करण्यात येत आहे. सदरचे काम माहे मे, 2024 अखेर पूर्ण करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्यात येईल, तोपर्यंत सध्या सुरू असणारी दर्शनी व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाच्या कामांबाबत पुढील 15 दिवसात मंदिर समिती, सल्लागार परिषद, वारकरी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
सदर कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही, कामे दर्जेदार व मूर्तीचे संरक्षण करून करावयाची असल्याने वारकरी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
#श्री_विठ्ठल_रुक्मिणी_मंदिरे_समिती #vitthalrukmini #vitthalrakhumai #ImportantUpdate #LatestNews #pandharpur #pandharpurnews #pandharpurtemple #vitthal #rukmini